गोवन पापलेट करी - Goan Pomfret Curry

गोवन पापलेट करी - Goan Pomfret Curry


खास गोव्याच्या चवीची, खूप प्रसिद्ध अशा गोवन पापलेट करीची सोपी आणि सविस्तर पाककृती आपण करणार आहोत. ही पाककृती चवीला अप्रतिम असते आणि करायलाही सोपी. चला तर मग करूया सुरुवात. यासाठी लागणार साहित्य पाहून घेऊ.
=========== साहित्य =============
  1. पापलेट - पाऊण किलो
  2. हळद - पाव चमचा
  3. ओलं खोबरं - १ कप
  4. मिरची पूड (बेडगी) - ५ चमचे
  5. जिरं - १ चमचा
  6. धणे - ४ चमचे
  7. लसूण - ४ ते ५ पाकळ्या
  8. किसलेलं आलं - २ चमचे
  9. चिंचेचा कोळ - २ चमचे (चिंच - मध्यम बोराएवढी)
  10. कांदा - मध्यम आकाराचा बारीक चिरून
  11. टोमॅटो - मध्यम आकाराचा बारीक चिरून
  12. हिरवी मिरची - २ (मध्ये चिरून)
  13. खोबरेल तेल - ४ चमचे
  14. मीठ
  15. कोथिंबीर - बारीक चिरून
=========== कृती ============
--- प्रथम पापलेट स्वच्छ धुवून मग हळद आणि थोडं मीठ लावून ठेऊया.
म्हणजे माश्याला मीठ छान मूरते.


--- आता कांदा व टोमॅटो बारीक चिरून ठेवा.
--- गोवन करी मसाला करण्यासाठी ओलं खोबरं, जिरं, धणे, लसूण, आलं, बेडगी मिरची पूड, चिंच आणि पाणी घेऊन अगदी बारीक वाटून घ्या.
--- गॅसवर पातेलं गरम करून त्यात खोबरेल तेल घाला. (खोबरेल तेलाने गोवन पापलेट करीला त्याची विशिष्ठ चव प्राप्त होते.)
--- तेल तापलं की त्यात चिरलेला कांदा चांगला गुलाबी रंगावर परतून घ्या.
--- मग चिरलेला टोमॅटो घालून चांगलं परतून घ्या. कांदा टोमॅटो छान नरम होऊ द्या.
--- गॅस फुल करा आणि आपण बारीक वाटलेला मसाला घालून २ मिनिटं चांगलं परतून घ्या.
--- जितकी करी हवी आहे त्या आवश्यकतेनुसार पाणी आणि मीठ घालून एक उकळी येऊ द्या.
--- उकळी आली की हळद मीठ लावलेले पापलेट या करीत सोडा.

--- मधून चिरलेल्या २ हिरव्या मिरच्या करीत सोडा.
--- आता गॅस मिडीयम फ्लेम वर झाकण ठेवून १० ते १५ मिनिटं मासे शिजू द्या.
शिजलेला मासा नाजूक असतो त्यामुळे चमच्याने हलवताना अगदी हळू सांभाळून मासे हलवा.
--- बस्स आता वरून चिरलेली कोथिंबीर घातली की आपली गोवन पापलेट करी वाढायला तयार आहे.
काय सुटलं ना तोंडाला पाणी. मग लगेचच गोवन पापलेट करी बनवा. आणि आपला अनुभव कंमेंट्स मार्फत माझ्याशी शेअर करा.




Comments